लक्ष्मण मोरे पुणे : शहरातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. या परिस्थितीमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाग्रस्तांकरिता देवदूत ठरत आहेत. वैद्यकीय सेवेचा वसा घेतलेले असेच एक डॉक्टरदाम्पत्य कोरोनासोबत लढा देत आहे. घरामध्ये किशोरवयीन मुलांसह वयस्क आईवडिलांची काळजी घेत हे उच्चपदस्थ पती-पत्नी समर्पित भावनेने रुग्णसेवा करीत आहेत.डॉ. मिलींद खेडकर आणि त्यांची पत्नी डॉ. सुनिता असे या दाम्पत्याचे नाव आहे . डॉ. मिलींद हे महापालिकेचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकार म्हणून काम करतात. तर डॉ. सुनिता या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापिका आहेत. या दोघांन अथर्व (वय १५) आणि अमेय (१३) अशी दोन मुले आहेत. त्यांचे वडील (वय ७५) आणि आई (वय ७०) त्यांच्यासोबतच राहण्यास आहेत. वडिलांना वयोमानाप्रमाणे मधूमेह आणि रक्तदाब तर आईला रक्तदाब आणि संधिवाताचा त्रास आहे. या सर्वांची काळजी घेऊन हे दोघेही आपले कर्तव्य पार पाडत आहेत.सुनीता या ससून रुग्णालयातील कोरोना संक्रमित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करीत आहेत. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना आयसीयु व वॉर्डमध्ये सेवा देण्याचे काम त्या करीत आहेत. रुग्णांच्या श्वसनावर, तसेच शरीरातील ऑक्सिजनवर लक्ष ठेवणे, आवश्यकता सल्यास रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी टाकुन व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे जोखमीचे काम त्या सध्या करीत आहेत. कोरोना कक्ष सुरु झाल्यापासून सलग ७ दिवस ड्युटी करुन रुग्णालयाने नेमून दिलेल्या हॉटेलमध्ये राहावे लागत आहे. तसेच 7 दिवसानंतर त्याच हॉटेलमध्ये आणखी ७ दिवस विलग राहावे लागणार आहे. आजवर मुलांपासून एवढे दिवस कधीही दूर न राहिलेल्या सुनीता या ड्युटी संपल्यानंतर मुलांना व्हिडीओ कॉल करुन गप्पा मारतात. आई-वडिलांच्या सूचनांचे पालन करीत दिवसभर मुले अभ्यास व वाचन करीत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अर्थातच आजी आजोबांवर येऊन पडली आहे.
Corona virus : वैद्यकीय सेवेचा वसा समर्थपणे चालवत दाम्पत्यांची कोरोनासोबत लढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:43 IST
मुलांना सोडून आईला राहावे लागते १५ दिवस रुग्णालयातच
Corona virus : वैद्यकीय सेवेचा वसा समर्थपणे चालवत दाम्पत्यांची कोरोनासोबत लढाई
ठळक मुद्देएकत्र कुटुंब पद्धतीचा झाला फायदा