Corona virus : दिलासादायक! पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या ५५ वरून आली अवघी ३३ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 18:35 IST2020-10-20T18:35:07+5:302020-10-20T18:35:26+5:30
मागील वेळी घोषित करण्यात आलेल्या ५५ प्रतिबंधित क्षेत्रापैकी २२ क्षेत्र रुग्ण कमी झाल्याने वगळण्यात आले आहेत..

Corona virus : दिलासादायक! पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या ५५ वरून आली अवघी ३३ वर
पुणे : शहरामध्ये कोरोना रुग्णांचा प्रसार आता उपनगरांमध्ये अधिक होत असल्याचे दिसत आहे. उपनगरांमधील कोंढवा, धनकवडी, हडपसर, कोथरूड आणि नगर रस्ता सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत. मागील वेळी घोषित करण्यात आलेल्या ५५ प्रतिबंधित क्षेत्रापैकी २२ क्षेत्र रुग्ण कमी झाल्याने वगळण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सोमवारी संध्याकाळी काढले.
महापालिकेने शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेनुसार धनकवडी-सहकारनगर, नगररस्ता-वडगाव शेरी, कोथरुड-बावधन, हडपसर-मुंढवा, कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत. पालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याची पुनर्रचना केली जात आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतल्यानंतर ज्या भागातील रुग्ण कमी झाले आहेत त्या २२ भागातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. तर, भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, बिबवेवाडी, येरवडा, वारजे या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत फक्त एक-एकच प्रतिबंधित क्षेत्र शिल्लक राहिले आहेत.