लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित झालेली कोविशिल्ड लस मंगळवारी (दि. १२) सकाळी पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून देशभर रवाना झाली. जगातली सर्वात मोठी लशीकरण मोहीम येत्या १६ जानेवारीपासून देशभर सुरू होत आहे.
या पार्श्वभूमीवर कोविशिल्ड लशीची पहिली तुकडी विमानाने दिल्लीला रवाना झाली.
मंगळवारी पहाटे साडेचारनंतर कोरोना लस घेऊन जाणारी शीतवाहने सिरम इन्स्टिट्यूटमधून कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगाव विमानतळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. पहिल्या टप्प्यात तीन ट्रकमधून ही लस पोहोचवण्यात आली. आता येथून पुढे केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे सिरममधून नियमित पुरवठा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटकडे एक कोटी दहा लाख लशींची मागणी नोंदवलेली आहे.
कोविशिल्ड लस घेऊन जाणारे पहिले तीन ट्रक रवाना होण्यापूर्वी या वाहनांची पूजा करण्यात आली. या वेळी सिरमच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाने ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर केला. दिवसभरात लशीचे एकूण सहा ट्रक पुणे विमानतळावर पोहोचवले. तेथून कार्गो विमानाने त्याची वाहतूक देशभर करण्यात आली. दिल्लीसह मुंबई, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोविशिल्ड लस पोहोचली आहे.
दरम्यान, माध्यमांना चकवा देण्यासाठी आणि बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी सोमवारी रात्री कंटेनर निघण्याची वेळ उशिराची कळवण्यात आली होती. प्रत्यक्षात सांगितलेल्या वेळेच्या चार तास आधीच लस घेतलेेले कंटेनर विमानतळाकडे रवाना झाले. याहीवेळी काही माध्यम प्रतिनिधी सिरम इन्स्टिट्यूट बाहेर उपस्थित होते. मात्र, त्यांना या कंटेनरचा पाठलाग न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
चौकट
पुण्यातून देशात
संपूर्ण पुणे शहर पहाटेच्या झोपेत असताना साडेचार वाजता सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड डोस घेतलेले तीन कंटेनर बाहेर पडले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पंधरा किलोमीटर अंतर कापत ते पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहोचले. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पहिले विमान ही लस घेऊन उडाले आणि पुढच्या दोन-अडीच तासांत या लशी देशभर पोहोचण्यास सुरुवात झाली. अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळूरू, कर्नाल, हैदराबाद, लखनौ, गुवाहाटी, विजयवाडा, भुवनेश्वर आणि चंदीगड या शहरांमध्ये पुण्यातून लस पोहोचवली जात आहे.