Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 00:08 IST2021-04-25T00:08:38+5:302021-04-25T00:08:50+5:30
दिवसभरात अवघ्या ५ हजार २७२ जणांनाच लस देण्यात आली.

Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला
पुणे : पालिकेकडे शिल्लक असलेल्या लसींचा साठा शनिवारी सकाळीच संपला. त्यामुळे शहरातील निम्म्याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण झाले. उर्वरित ठिकाणी नागरिकांना हात हलवत परत जावे लागले. दिवसभरात अवघ्या ५ हजार २७२ जणांनाच लस देण्यात आली. साथ संपल्यावर अनेक केंद्रांवर साठा संपल्याचे फलक लावण्यात आले होते.
मागणीप्रमाणे लसी प्राप्त मिळत नसल्याने पालिका प्रशासनातील अधिकारी हतबल झाले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत लसींचा नवीन साठा प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे रविवारच्या लसीकरणावर त्याचा परिणाम होणार आहे. रात्रीतून साठा प्राप्त न झाल्यास शहरातील लसीकरण रविवारी बंद ठेवावे लागणार आहे.
येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. परंतु, सध्या लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने मोठा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. शहराला मागील दोन दिवसांपासून लसच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालिकेकडील सर्व साठा संपला आहे. त्यामुळे १७२ लसीकरण केंद्रांपैकी जेमतेम निम्म्याच केंद्रांवर जेवढ्या लसी शिल्लक होत्या तेव्हढ्या देण्यात आल्या. मागील सव्वातीन महिन्यांत ७ लाख ५० हजार लसीकरण झाले आहे. यामध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे.