Corona Vaccination Pune: पुणेकरांनो, लसींचा पुरवठा न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र शुक्रवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 22:03 IST2021-05-20T21:54:51+5:302021-05-20T22:03:40+5:30
पुणेकरांनो, राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार

Corona Vaccination Pune: पुणेकरांनो, लसींचा पुरवठा न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र शुक्रवारी बंद राहणार
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. मागील शनिवारपासून तीन दिवस पुणे शहरातील लसीकरण बंद होते. सरकारकडून लसी प्राप्त झाल्यानंतर काही प्रमाणात बुधवारी ते सुरू झाले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी(दि.२१) पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेला राज्य सरकारकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा झाला नव्हता. शहरातील लसीकरण केंद्र गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे.काही प्रमाणात लसी प्राप्त मिळाल्यानंतर लस देणे सूूरु झाले होते. पण पुुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या गुरूवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आज दिवसभरात शहरात केवळ ९३१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.या आठवड्यात रूग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १५ हजार ४३ वर आली आहे. आज दिवसभरात १ हजार ७६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १२ हजार २२६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही केवळ ७.६१ टक्के इतकी आढळून आली आहे. रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजाराच्या आसपास असतानाही आज यात दोन हजाराने वाढ झाली तरी, नव्या कोरोनाबाधितांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली आहे.