पुणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर; लसींचा तातडीने पुरवठा करा; सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:55 IST2021-04-08T14:55:10+5:302021-04-08T14:55:47+5:30
पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपल्याने १०९ केंद्र बंद; केंद्राने तातडीने लस उपलब्ध करून द्यावी...

पुणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर; लसींचा तातडीने पुरवठा करा; सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी
पुणे: पुणे जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसींचा तुटवडा भासतो आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेत अडथळा येत आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने तातडीने पुणे जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुणे,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, या कोरोनविरुद्धच्या लढाईत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा लसीकरणाची मोहीम राबवत आहे. परंतू, अनेक केंद्रावरचा लसींचा साठा संपल्यामुळे हजारो नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली आहे.
लसच उपलब्ध नसल्यामुळे पुणे जिल्ह्यातील १०९ लसीकरण केंद्रे आज बंद करावी लागली आहेत. लसीच्या पुरेशा साठ्याअभावी संबंधीत केंद्रांवरील डॉक्टर्स आणि एकूणच आरोग्य यंत्रणा हतबल आहेत. हे निराशावादी चित्र बदलण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे असेही सुळे यांनी यावेळी संगीतले आहे.
पुणे जिल्ह्यात आज ३९१ लसीकरण केंद्रांवर एकूण ५५ हजार ५३९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. असे असले तरी लसींचा साठा संपल्यामुळे हजारो नागरिकांना परत जावे लागले. ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
.