Corona Restrictions Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून नियम बदलणार; नवीन नियमावली वाचा 'एका क्लिकवर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 17:01 IST2021-06-26T16:44:49+5:302021-06-26T17:01:38+5:30
येेेत्या सोमवारपासून (दि.२८) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Corona Restrictions Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून नियम बदलणार; नवीन नियमावली वाचा 'एका क्लिकवर'
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्याने पुन्हा एकदा शुक्रवारी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध जाहीर केले आहे. आता याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने देखील नवीन नियमावली जाहीर करत निर्बंध कडक सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.
येेेत्या सोमवारपासून (दि.२८) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात दुपारी ४ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र पूर्णतः बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांना आणि व्यावसायिकांसाठी पुन्हा एकदा नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट - सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी चारनंतर तसेच शनिवार व रविवार रात्री११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा देता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने ही केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सकाळी ५ ते ९ या वेळेत आऊटडोअर खेळ खेळता येऊ शकणार आहेत. तसेच व्यायामशाळाही पाच दिवस सुरू राहतील. ई-कॉमर्स, कृषी संबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने राज्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता निर्बन्ध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी संध्याकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ तीन तासांनी कमी करण्यात आली आहे. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार यांची वेळही सहा तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
----
सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न व मनोरंजन कार्यक्रम यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीत घेता येणार आहेत. या कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच परवानगी राहणार आहे. हे कार्यक्रम ३ तासांपेक्षा अधिक काळ असू नयेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
----
सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.
अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
-----
ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील.
-----
१.पीएमपीएमएमएल आसन क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेने सुरु राहील.
२. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी.
३. खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी.
४. ही वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास बंधनकारक.
५. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळीला परवानगी.
------
पालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था १५ जुलै २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण
संस्था पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.
------
मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरु राहील.