पुणे : पालकमंत्री पदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील. आमचा पालकमंत्री पदाबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला. यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजपचे सरचिटणीस रवी साळेगावकर, प्रमोद कोंढरे, स्वरदा बापट, डॉ. संदीप बुटाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून, सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवासदेखील करत आहोत. ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारतर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.
पुण्याच्या दोन महापालिका केल्याच पाहिजे
पुणे शहरात दोन महापालिकांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले, याचा अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराचे सर्वच प्रश्न माहीत आहेत. पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्याचे महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रश्न आम्ही त्यांना देणार आहोत. ३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे, म्हणून दोन महानगरपालिका केल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला मिळणार गती
पुरंदर विमानतळासंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून भूसंपादनाबाबत गती मिळणार आहे. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलणे हा केंद्राचा विषय
भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणत: दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारिणी बदलत असते. ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत असतात.