लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मी अनेक उद्योगपतींकडे आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला होता, परंतु केवळ अतुर संगतानी यांनी मला मदत केली. सुरुवातीच्या काळात पैशाची अत्यंत निकड असताना त्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली. संगतानी हे बांधकाम उद्योगातील असल्याने त्यांनी ‘सिंबायोसिस’च्या सर्व इमारती या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर बांधल्या,” असे ‘सिंबायोसिस’चे संस्थापक आणि अध्यक्ष. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले.
सिंबायोसिस विश्वभवन सभागृहात आयोजित अतुर संगतानी जन्मशताब्दी कार्यक्रमात डॉ. मुजुमदार बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक फिरोज पूनावाला, अतुर संगतानी यांच्या कन्या नलिनी गेरा, नातू राजीव तसेच ‘सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले की, संगतानी यांना सिंबायोसिसबद्दल केवळ प्रेमच नव्हते तर त्यांचे संपूर्ण मुजुमदार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सिंबायोसिसच्या वाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. सिंबायोसिसला आर्थिक मदत करताना परताव्यासाठी ते कोणतेही व्याज घेत नसत. संगतानी यांच्या निधनानंतर सिंबायोसिसच्या मॉडेल कॉलनीतील एका इमारतीस त्यांचे नाव दिले. आज त्यांच्या शताब्दीनिमित्त मी जाहीर करतो की सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगतानी यांच्या नावे ‘इन्स्टिट्यूट चेअर’ची स्थापना करण्यात येईल.
“पुण्यातील अपार्टमेंट पद्धतीच्या बांधकामाचे प्रणेते अतुर संगतानी होते. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधीही निराश केले नाही,” असे पूनावाला यांनी सांगितले. “डॉ. मुजुमदार व सौ. मुजुमदार यांना ज्या वेळी मदतीची आवश्यकता असे त्या वेळी ते संगतानींची भेट घेत. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे सिंबायोसिसबरोबर असलेले संबंध हे केवळ संगतानी यांच्यामुळेच निर्माण झाले,” असे डॉ. येरवडेकर म्हणाल्या. “माझ्या वडिलांनी मला नेहमीच लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यास शिकवले,” असे नलिनी गेरा यांनी सांगितले.