आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; धनंजय मुंडेंची अभिनव संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:23 IST2022-06-20T18:22:55+5:302022-06-20T18:23:03+5:30
पुण्यातील नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; धनंजय मुंडेंची अभिनव संकल्पना
आळंदी : कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली 'ज्ञानोबा-तुकोबांची' पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात आळंदी वरून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत हजारो वारकरी आणि दिंडी दाखल झाल्या आहेत. यंदा माऊलींच्या जयघोषाबरोबर संविधान दिंडी वारीत सहभागी होणार आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळयात ज्ञानोबा - तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येणार आहे. आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली आहे. पालखी मार्गावर सर्वत्र संविधानिक मूल्यांचा गजर भजन - कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून १० जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे.
गुरुवारी (दि.२३) पालखी मुक्काम स्थळाजवळ पुण्यातील नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ सिने कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांसह आदी उपस्थित राहणार आहेत.