वडगाव मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठी काही सराईत गुन्हेगारांनी कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार शेळके यांनी हा गंभीर प्रकार विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला आणि गंभीर प्रश्न उपस्थित केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावर उत्तर देताना सात दिवसांच्या आत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची ग्वाही दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे येथे गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली होती. सात सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. या टोळीकडून ९ पिस्तुले, ४२ जिवंत काडतुसे, कोयते आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या गुन्हेगारांवर आधीही खून, खंडणी, तोडफोड व बेकायदेशीर हत्यारे बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान या गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेल्या जबाबांमध्ये सांगितले की, हा सर्व शस्त्रसाठा आमदार शेळके यांची हत्या करण्यासाठी होता. गुन्हेगार मध्य प्रदेश, जालना आणि पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधून असल्याचे समोर आले असून, त्यांचे आमदारांशी कोणताही वैयक्तिक वैर नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गृहराज्यमंत्री कदम यांनी याप्रकरणी सात दिवसांच्या आत एसआयटी नेमण्याची ग्वाही दिली.