पुणेकरांना दिलासा !रुग्ण वाढीचे प्रमाण घटले . पुणेकर नियम मोडायचे मात्र थांबेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 12:08 IST2021-05-14T11:59:45+5:302021-05-14T12:08:17+5:30
दोन महिन्यात मास्क न घालण्याबद्दल 6 कोटींचा दंड वसूल

पुणेकरांना दिलासा !रुग्ण वाढीचे प्रमाण घटले . पुणेकर नियम मोडायचे मात्र थांबेनात
गेले काही आठवडे सातत्याने कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर आता पुण्याला चांगला दिलासा मिळालेला बघायला मिळतो आहे. पुणे शहराचा जवळपास 24 टक्क्यांवर गेलेला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेशो आता 15 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याबरोबरच सीएफआर म्हणजेच एकूण मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण देखील आता कमी झालेले बघायला मिळत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये हे प्रमाण जवळपास 2.60 टक्क्यांवर गेले होते. आता हे प्रमाण 1.64 टक्क्यांवर आलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कोरोना आढावा बैठकी मध्ये महापालिकेने सादर केलेल्या आकडेवारी मधून ही माहिती समोर आली आहे. सध्या शहरामध्ये एकूण 230 मायक्रो कंटेनमेंट झोन असून यामध्ये बिबेवाडी सर्वाधिक म्हणजे 37 तर औंध बाणेर मध्ये 34 झोन आहेत. प्रभागनिहाय आकडेवारीत मात्र हडपसर मुंढवा वॉर्ड ऑफिस मध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ पाहायला मिळत आहे तर त्याखालोखाल नगर रोड आणि वडगाव शेरी मध्ये रुग्ण वाढ झालेली आहे. सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे अजूनही जास्त असल्याने ही देखील एक दिलासादायक बाब ठरली आहे.
दरम्यान अजूनही नागरिक नियम तोडताना पहायला मिळत आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार घालण्यासाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये 1,11,682 नागरिकांकडून 6.44 कोटी इतका दंड करण्यात आला तर थुंकण्याबद्दल 2024 लोकांना दंड करण्यात आला. आत्तापर्यंत मास्क साठी करण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही 19.87 कोटींवर पोचली आहे.
लसीकरणाच्या बाबतीत मात्र लसीच्या उपलब्धतेमुळे शहरात आत्तापर्यंत नऊ लाख 35 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले दिसते आहे. यामध्ये 18 ते 44 मधल्या 18508 नागरिकांनाच लसीचा पहिला डोस मिळाला मिळाला आहे.