महापुरुषांच्या छायाचित्रांवरून गोंधळ

By Admin | Updated: December 19, 2014 23:51 IST2014-12-19T23:51:06+5:302014-12-19T23:51:06+5:30

महापालिकेच्या वतीने नववर्षाच्या कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे न छापता ते प्रसिद्ध करण्यात

Confusion of great personalities | महापुरुषांच्या छायाचित्रांवरून गोंधळ

महापुरुषांच्या छायाचित्रांवरून गोंधळ

पुणे : महापालिकेच्या वतीने नववर्षाच्या कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे न छापता ते प्रसिद्ध करण्यात आल्याच्या प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाने छापलेले कॅलेंडर वितरीत करू नये, याचे आदेश दिले. आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रकरणी कॅलेंडर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नववर्षाच्या कॅलेंडरचे सर्वसाधारण सभेमध्ये महापौर व पक्षनेत्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शहराचा वारसा सांगणाऱ्या वास्तू व व्यक्तींवर हे कॅलेंडर तयार करण्यात आले होते. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी कॅलेंडरमध्ये महापुरुषांची छायाचित्रेच नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या वतीने ५ हजार ६०० कॅलेंडर छापण्यात आले आहेत. एका कॅलेंडरची किंमत ४७ रुपये धरली, तर २ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च या कॅलेंडरवर झाला आहे, याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न राजेंद्र वागस्कर यांनी उपस्थित केला. सभागृहनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे यांनी त्यानंतर कॅलेंडर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, याची जोरदार मागणी लावून धरली. किशोर शिंदे, आबा बागूल, सिद्धार्थ धेंडे यांनीही त्या मागणीला पाठिंबा दर्शविला. निवडणुकीमध्ये छत्रपतींच्या नावाने मते मागता,
मग आता शांत का? अशी विचारणा कमल व्यवहारे यांनी भाजपा
सदस्यांना केली. (प्रतिनिधी)

Web Title: Confusion of great personalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.