कोंढापुरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:09+5:302021-07-15T04:09:09+5:30
धनंजय गायकवाड, नानासाहेब गायकवाड, राहुल दिघे, स्वप्निल लवांडे आदींनी या मोडकळीस आलेल्या इमारतीची पाहणी केली. पुणे-नगर हमरस्त्यावरील कोंढापुरी हे ...

कोंढापुरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था
धनंजय गायकवाड, नानासाहेब गायकवाड, राहुल दिघे, स्वप्निल लवांडे आदींनी या मोडकळीस आलेल्या इमारतीची पाहणी केली.
पुणे-नगर हमरस्त्यावरील कोंढापुरी हे मुख्य गावांपैकी एक गाव असून, येथे तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातर्गत कोंढापुरी, बुरुंजवाडी, टेमघर पुनर्वसन व जवळची लोकवस्ती असा भाग या उपकेंद्र अंतर्गत येतो. या उपकेंद्रामध्ये कोंढापुरी गावची २०११ ची अधिकृत लोकसंख्या ३ हजार ९१ असून, तसेच बुरुंजवाडी गावाची २ हजार ५०० आहे. मात्र अवांतर दहा ते पंधरा हजारापर्यंत लोकसंख्या गेली असून तेथील सर्व नागरिक या उपकेंद्राच्या आरोग्य सुविधेवर अवलंबून आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या आरोग्य उपकेंद्राची इमारत पडलेल्या नादुरुस्त अवस्थेत असून सदर आरोग्य केंद्र इमारतीचे नूतनीकरण तत्काळ होणे आवश्यक आहे.
आरोग्य केंद्राची इमारत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या छोट्याशा जागेमध्ये आरोग्य उपकेंद्राचे लहान मुलांची लसीकरण, गरोदर मातांचे मार्गदर्शन व इतर सर्व आरोग्य उपकेंद्राचे कामकाज चालू आहे तसेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या गावांमध्ये सुपर स्प्रेडर व्यावसायिक, दुकानदार तसेच गावातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारती मध्ये ग्रामस्थांचे लसीकरण व सुपर स्प्रेडर यांच्या टेस्ट करण्याचे काम चालू असते .शाळेमधील जागा लसीकरणासाठी तसेच अँटिजन/RTPCR टेस्ट करण्यासाठी शाळेची जागा वापरणे योग्य नाही. कारण तेथे मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा वावर वाढत आहे.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन रुग्णांचे होणारे हाल व अनेक गैरसोयी बाबत आरोग्य उपकेंद्राबाबतची समस्या दूर करून इमारत उभी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी केली. या वेळी नानासाहेब गायकवाड, संतोष दिघे, राहुल दिघे, स्वप्निल लवांडे हे उपस्थित होते.
कोंढापुरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीची ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे, त्यासाठी लवकरच निधी मंजूर करून उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
कोंढापुरी येथील मोडकळीस आलेली आरोग्य उपकेंद्राची इमारत दाखविताना धनंजय गायकवाड व ग्रामस्थ.