एमबीएसाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल
By Admin | Updated: May 24, 2014 05:00 IST2014-05-24T05:00:52+5:302014-05-24T05:00:52+5:30
व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट तंत्रशिक्षण परिषदेने (डीटीई) शिथिल केली आहे

एमबीएसाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल
पुणे : व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट तंत्रशिक्षण परिषदेने (डीटीई) शिथिल केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर तीन महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करता येईल. या निर्णयामुळे एमबीए आणि तत्सम अभ्यासक्र माला प्रवेश घेणार्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वाणिज्य शाखेतील एमबीए, एमएमएस, पीजीडीएम असे व्यवस्थापनशास्त्र विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय, प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका डीटीईने जाहीर केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (बार्टी) जात प्रमाणपत्र देण्यावर पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मर्यादा येत आहे. संपूर्ण राज्यामध्ये जात पडताळणीसाठी फक्त १५ समित्या आहेत आणि प्रलंबित प्रकरणे ९० हजारांच्या वर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्रे देता येणार नाहीत, असे बार्टीने डीटीईला कळविले आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात आली असल्याचे डीटीईतर्फे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रवेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यासंदर्भात, भारिप बहुजन महासंघातर्फे समाजकल्याण आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना राखीव कोट्यातून प्रवेश द्यावा आणि प्रमाणपत्रासाठी ९० दिवसांची मुदत द्यावी. विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याला सवलत नाकारून खुल्या गटातून पूर्ण फी घेऊन प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)