क्षेत्र सासवड (ता. पुरंदर) येथे संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता प्रक्षाळ पूजनाने करण्यात आली. ६ जानेवारी पासून हा सोहळा सुरु झाला होता. यामध्ये पहाटे काकडा आरती, सकाळी कीर्तन, दुपारी प्रवचन, हरिपाठ, रात्री पुन्हा कीर्तन, त्यानंतर जागर असे कार्यक्रम सुरु होते.
मंगळवारी पहाटे काकडा आरती झाल्यानंतर संत सोपानदेव महाराज समाधी आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. यावेळी संत सोपानदेव देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. गोपाळ गोसावी, व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, त्रिगुण गोसावी, केशव महाराज नामदास, विठ्ठल महाराज नामदास तसेच चोपदार उपस्थित होते. सकाळी ९ ते ११ या वेळात म्हस्कू महाराज कामठे (चांबळी) यांचे कीर्तन झाले.
त्यानंतर ११ वाजता म्हस्कू महाराज कामठे यांच्या हस्ते संत सोपानदेव समाधीस गरम पाण्याने प्रक्षाळ पूजा घालण्यात आली. यावेळी राज्य भरातून आलेल्या वारकऱ्यांनी समाधीस गरम पाण्याने अभिषेक घालून महापूजा केली. रात्री ८ ते १० या वेळात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित भाविक आणि वारकऱ्यांना प्रसाद म्हणून दुधाचा काढा देण्यात आला. त्यानंतर रात्री रोकडोबा दादा दिंडीचा जागर झाला. यानंतर संत सोपानदेव समाधी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. सोहळा काळात आमदार संजय जगताप यांनीही समाधीची महापूजा केली असून संत सोपानकाका बँकेच्या वतीनेव सासवस नगर पालिकेच्या वतीने सोहळ्यासाठी विविध सोई सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
फोटो ओळ ; क्षेत्र सासवड येथील संत सोपानदेव समाधीस कीर्तनकार म्ह्स्कू महाराज कामठे यांच्या हस्ते गरम पाण्याने प्रक्षाळ पूजा घालण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर.