गुंतागुंतीची रचना, नागरिक गोंधळात, एका प्रभागाच्या हद्दीत ४ विधानसभा मतदारसंघ अन् ४ क्षेत्रीय कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:43 IST2025-08-25T13:42:34+5:302025-08-25T13:43:14+5:30

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेत सीमोल्लंघनाने अक्षरश: उलथापालथ झाली आहे

Complex structure citizens in confusion 4 assembly constituencies and 4 regional offices within the boundaries of one ward | गुंतागुंतीची रचना, नागरिक गोंधळात, एका प्रभागाच्या हद्दीत ४ विधानसभा मतदारसंघ अन् ४ क्षेत्रीय कार्यालये

गुंतागुंतीची रचना, नागरिक गोंधळात, एका प्रभागाच्या हद्दीत ४ विधानसभा मतदारसंघ अन् ४ क्षेत्रीय कार्यालये

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत एका प्रभागात दोन ते चार विधानसभा मतदारसंघ आणि क्षेत्रीय कार्यालयाचा भाग आलेला आहे. चार ते पाच प्रभागांत असा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्रभाग क्र. १३ पुणे स्टेशन-जयजवाननगरमध्ये चार विधानसभा, चार क्षेत्रीय कार्यालये जोडण्यात आली आहेत. त्यामुळे सोयीस्कर मतदानाचे पॉकेट जोडण्यासाठी भौगोलिक सीमारेषा पाळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या प्रभागामध्ये प्रशासकीय गुंतागुंत वाढली असून, नागरिकांचाही गोंधळ उडाला आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेत सीमोल्लंघनाने अक्षरश: उलथापालथ झाली आहे. २०१७ साली निवडणूक झालेल्या जुन्या प्रभागाचे तीन-चार तुकडे होऊन आजूबाजूच्या प्रभागांत मिसळून नवीन प्रभाग निर्माण झाला आहे. प्रभागरचना करताना काही ठिकाणी डोंगर, टेकड्या, नदी, नाले आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या सीमा पाळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे एका प्रभागात दोन ते चार विधानसभा मतदारसंघ आणि क्षेत्रीय कार्यालयाचा भाग आलेला आहे. प्रभाग क्र. १३ पुणे स्टेशन-जयजवाननगरमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, कसबा, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा भाग जोडलेला आहे. या प्रभागात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय, येरवडा क्षेत्रीय कार्यालय, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, घोले रोड या चार क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. बंडगार्डन, कोरेगाव पार्क, फरासखाना, समर्थ पोलिस, येरवडा पाच पोलिस ठाण्यांचा समावेश केला आहे. या प्रभागात एक खासदार, चार आमदार आले आहेत. या प्रभागाच्या हद्दीत चार क्षेत्रीय कार्यालये आल्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत वाढणार आहे.

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा करण्यात आला आहे. या प्रभागाच्या हद्दीत पुरंदर, हडपसर आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग या प्रभागात आहे. या प्रभागाच्या हद्दीत कोंढवा येवलेवाडी, धनकवडी सहकारनगर या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीचा समावेश आहे. या एका प्रभागात दोन खासदार, तीन आमदार, दोन क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रभाग क्रमांक ३८ चा भौगोलिक भाग पाहता २०१७च्या निवडणुकीत येथे दहा माजी नगरसेवक निवडून आले होते. पण, आता पाच सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे पाच माजी नगरसेवक घरी बसणार आहेत.

Web Title: Complex structure citizens in confusion 4 assembly constituencies and 4 regional offices within the boundaries of one ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.