‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा
By Admin | Updated: July 4, 2017 03:24 IST2017-07-04T03:24:06+5:302017-07-04T03:24:06+5:30
शहरात व पुरंदर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या मीटरचे वेळेत रीडिंग न घेतल्यामुळे वाढीव स्वरूपात नागरिकांना

‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : शहरात व पुरंदर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या मीटरचे वेळेत रीडिंग न घेतल्यामुळे वाढीव स्वरूपात नागरिकांना वीजबिल येत असल्याबाबत सासवड नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अभियंत्यांना निवेदन देऊन तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका पुष्पा नंदकुमार जगताप यांनी सासवडच्या नागरिकांच्या वतीने तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने वीजबिल वाढीबाबत अभियंता मदन शेवाळे यांना विचारणा केली.
मीटर रीडिंगचे छायाचित्र वेळेवर आणि व्यवस्थित न घेणे, ग्राहकांना वेळेत वीजबिल न देणे, वाढीव वीजबिल दुरुस्त करण्यास विलंब लावणे आदी कारणांमुळे शहरातील नागरिक विद्युत कंपनीवर नाराज आहेत. तसेच, वीजबिलाची दुरुस्ती वेळेवर न झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप झाल्याने काहींच्या जिवावर बेतल्याच्या घटना घडल्या असल्याबाबत निवेदनात नमूद केले आहे. त्यावर उपाय म्हणून, शहरातील सर्व मीटरचे छायाचित्र रीडिंगसह एकाच तारखेला घ्यावेत आणि ती तारीख वीजबिलावर नमूद करावी, यामुळे ग्राहकांचे युनिट वाढणार नाहीत व वीजबिल दुरुस्त करावे लागणार नाही.
ग्राहकांना अंतिम तारखेपूर्वी ३ ते ४ दिवस आधी वीजबिल मिळावे तसेच वीजबिलावरील स्थिर आकार म्हणून येत असलेल्या कायमच्या बिलाकडे लक्ष द्यावे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी अभियंता शेवाळे यांच्याकडे मीटर रीडिंग घेणाऱ्या आणि वीजबिल वाटप कारणाऱ्या ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी करत प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेपर्यंत रीडिंग घ्यावे, ग्राहकांना वीजबिल वेळेत मिळावे, वीजबिलाची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत वीजजोड तोडू नये, आणि यासारख्या अनेक बाबी आणि तक्रारी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष सागर जगताप, संभाजी जगताप व उपस्थितांनी केल्या.
त्यावर बोलताना अभियंता एम. एम. शेवाळे यांनी मीटर रीडिंग घेणारा आधीचा ठेकेदार बदलला आहे. यापुढे वेळेवर रीडिंग घेऊन ग्राहकांना वेळेत वीजबिल दिले जाईल.
तातडीने वीजबिल दुरुस्त करून दिले जाईल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी वीजबिल दुरुस्तीसाठी कॅम्प लावला जाईल. वीजबिल भरण्यासाठी हप्ते करून देण्याची व्यवस्था करू आणि कामात हलगर्जीपणा कारणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याचा ठेका बंद करू, मागील चुका टाळण्याचे काम सुरू असून वीजबिल दुरुस्तीचे अभियान राबविणार आहे, अशी आश्वासने दिली.
आंदोलनाचा इशारा
सासवड शहरात १० हजार २७१ ग्राहक असून, त्यांच्या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी ठेकेदाराच्या केवळ ६ व्यक्ती काम पाहत आहेत, त्यामुळे रीडिंगचे काम वेळेवर होत नाही. तसेच, ग्राहकांना वीजबिलही वेळेवर मिळत नाही, त्यामुळे वाढीव वीजबिलाचा फटका बसतो आणि नाहक दंड भराव लागत असल्याचे चित्र आहे.
यापुढे परिस्थितीत बदल न झाल्यास सासवडकर नागरिक बिल न भरण्याचे आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला.