पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली जात आहे. मयुरी जगताप यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप चाकणकर यांच्यावर करण्यात आला. तसेच जर तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी वाचली असती अशी प्रतिक्रियाही मयुरीने दिली होती. त्यावरून चाकणकर यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती दिली आहे. या प्रकरणात नणंद - भावजय क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले. अशा केसेसमध्ये पहिल्यांदा तीन समुपदेशन केले जातात, त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून ही कौन्सिलिंग केली गेली अशी माहिती रूपाली चाकणकरांनी सांगितले आहे.
चाकणकर म्हणाल्या, मयुरी आणि करिष्मा हगवणे यांच्या तक्रारी दिवशी प्राप्त झाल्या होत्या. करिष्मा हगवणे यांनी भाऊ आणि भावजयबद्दलची तक्रार महिला आयोगाला पाठवली. त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली. ती तक्रार मेघराज जगताप यांची म्हणजे मयुरी हगवणे यांच्या भावाची होती. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला पत्र पाठवून कारवाई करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या. तक्रारदारांना देखील आणि पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीने निर्देश दिले होते. या प्रकरणात क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले.
समुपदेशन करुन हा वाद मिटविण्याचा हेतू होता
वैष्णवीच्या संदर्भात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार नाही. पोलिसांनी या प्रकरणी उत्तम तपास केला आहे, बाळालाही वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुखरुप सोपवलं आहे. दरम्यान 6 नोव्हेंबर 2024 रोजी वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणेने महिला आयोगाकडे तिला भावाचा आणि वहिनीचा त्रास होतो अशी तक्रार केली, त्याच दिवशी मयुरीच्या (मोठी सून) भावाने (मेघराज जगताप) ही महिला आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारी पोलिसांकडे पाठविण्यात आल्या. त्यानुसार 7 नोव्हेंबरला बावधन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हा कौटुंबिक वाद होता, त्यामुळं समुपदेशन करुन हा वाद मिटविण्याचा हेतू होता.
वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी...
मयुरी हगवणे प्रकरणात चार्ज शीट दाखल झालं नाही, हे गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलीस स्टेशनचा भाग पुणे ग्रामीणमध्ये होता, आता तो भाग पिंपरी चिंचवड भागात आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आऊट ऑफ वे जाऊन काम करणं ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
माझ्यावर ते संस्कार नाहीत
वैयक्तिक टिकांची उत्तर मला ही देता येतात, पण माझ्यावर ते संस्कार नाहीत. विरोधकांना आमच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते. मी सुमोटो दाखल केल्याची विरोधकांना कल्पना नसावी. महिला आयोग केवळ संबंधित विभागाला पाठवण्याचे ते काम आहे. त्यानुसार पोलिसांकडे तक्रार गेली आणि मग एफआयआर झाली. त्यापुढं तपास करायचं काम त्यांचं असतं. एक विभाग एकचं काम करु शकतो, असंही पुढे चाकणकरांनी सांगितलं आहे.