'Company assets could have been sold' | 'कंपनीची संपत्ती विकून देता आले असते पैसे'
'कंपनीची संपत्ती विकून देता आले असते पैसे'

पुणे : डीएसके यांना २०१५ ते २०१७ या काळात कंपनीची संपत्ती विकून ठेवीदार आणि बँकांचे पैसे देता येणे शक्य होते. पैसे असतानाही त्यांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत. सर्वांना पैसे परत करायचे होते तेव्हा त्यांना संधी असताना ते दिले नाहीत. संपत्ती विकली नसल्याचा युक्तिवाद करीत डीएसके प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला.

डी. एस. कुलकर्णी , पत्नी हेमंती आणि शिरीष कुलकर्णी यांच्या जामीन तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी आणि अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. सेझची जमीन नातेवाइकांच्या नावे खरेदी करून त्यासाठी डीएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीतून पैसे दिले. यात १८४ कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्यातून गुंतवणूकदार व आयकर विभागाची फसवणूक झालीे. सेबी आणि आरबीआयचे नियम लागू होऊ नये म्हणून डीएसकेंनी भागीदारी कंपन्या काढल्या. डीएसकेडीएलमधील पैसे भागीदारी कंपन्यांमध्ये वर्ग केले. बँंकांकडून ज्यासाठी पैसे घेतले ती कामे केलीच नाही. फुरसुंगीच्या जमिनीचा व्यवहार हा २००९ साली झालेला आहे. मात्र तो व्यवहार २००६ साली झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या सर्व कटात आरोपींचा सहभाग आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला. अश्विनी देशपांडे यांची या प्रकरणातील भूमिका काय होती हे दोषारोपपत्र नमूद आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

डीएसके ग्रुपने आत्तापर्यंत ५० लाख चौरस फुटाचे बांधकाम केले आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही मोठी प्रलोभने दाखवली नव्हती. फायनान्स कंपन्या, बँंक आणि ठेवीदारांकडून घेतलेले पैसे ग्रुपकडून २०१७ पर्यंत नियमित परत करण्यात येत होते. या प्रकरणाचा फॉरेंसिक अहवाल देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप तो देण्यात आलेला नाही. पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवले म्हणून फसवणूक होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला.

Web Title: 'Company assets could have been sold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.