पारंपरिक कलाविष्कारांची जुगलबंदी
By Admin | Updated: March 22, 2015 00:53 IST2015-03-22T00:53:00+5:302015-03-22T00:53:00+5:30
शिल्पकलेतून घडलेला ‘व्यंग्यचित्रकारा’चा चेहरा आणि कथ्थक व भरतनाट्यम्सारख्या नृत्यशैलीचा एकाच वेळी घडलेला आविष्कार अशा माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्ताने पारंपरिक कलांची मेजवानी रसिकांनी अनुभवली.

पारंपरिक कलाविष्कारांची जुगलबंदी
पुणे : पखवाज, तबल्याचे पडघम... सरोदसारख्या वाद्यांमधून निघालेले मंजूळ ‘स्वर’’... कॅनव्हासवर झालेली रंगांची उधळण... शिल्पकलेतून घडलेला ‘व्यंग्यचित्रकारा’चा चेहरा आणि कथ्थक व भरतनाट्यम्सारख्या नृत्यशैलीचा एकाच वेळी घडलेला आविष्कार अशा माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्ताने पारंपरिक कलांची मेजवानी रसिकांनी अनुभवली. मंगलमयी आणि भारावलेल्या वातावरणात पुणेकरांनी मराठी नववर्षाचे स्वागत केले.
निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आणि आर्टवाला फेस्टिव्हलतर्फे आयोजित स्ट्रोक्स आॅफ ग्लोरी : जुगलबंदी आॅफ आर्टस या अनोख्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे उद््घाटन ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) चंद्रशेखर दैठणकर, चित्रकार मिलिंद मुळीक, मुरली लाहोटी, अशोक गोडसे, इक्बाल दरबार, संतोष उणेचा, पंडित शेखर बोरकर, पोलीस उपायुक्त तांबडे, डॉ. मिलिंद भोई, गिरीश चरवड, मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, संदीप भामकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात गिरीश चरवड (सरोद), अभिषेक बोरकर (सरोद), गणेश पापळ (पखवाज), रवी शर्मा (तबला) यांनी राग चारुकेशी सादर केला. त्याचवेळी सुलेखनकार मनोहर देसाई यांच्या कुंचल्यातून नववर्षारंभाचा संदेश कॅनव्हासवर रेखाटला जात होता. तर दुसरीकडे शिल्पकार प्रशांत गायकवाड यांनी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे शिल्प अवघ्या ३० मिनीटांत साकारले. सुरुवातीला नुपूर मोहनकर, रितीका चौधरी आणि देविका आपटे यांनी भरतनाट्यम् पुष्पांजली सादर केली. तर ज्योती साळवे यांनी सादर केलेल्या कथ्थकला रसिकांची भरभरून दाद मिळाली. आले.
दैठणकर म्हणाले, पोलिसांचा केवळ बंदोबस्ताशी संबंध असतो, असे नाही. तर पोलिसांमध्येही अनेक कलागुण लपलेले आहेत. पण त्याला योग्य वाट मिळत नाही. बंदोबस्त आणि ताणतणावातून बाहेर येण्याकरिता पोलिसांना कलेची मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
या वेळी चरवड यांच्या कलेक्शन आॅफ कार्व्हिंग, पेंटिंग अँड ड्रॉर्इंग या सीडीचे प्रकाशन आणि पेंटिंग प्रदर्शनाचे उद््घाटन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनात तब्बल ५० हून अधिक कलाकारांची पेंटिंग मांडण्यात आली आहेत. ऐतिहासिक वास्तू, निसर्गचित्रे अशी तब्बल १०० हून अधिक पेंटिंग आहेत. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
४ सगळ्या कलांचे उगमस्थान एकाच ठिकाणी असते. केवळ आविष्कारांमध्ये फरक असतो. कलाकारांमधील उत्स्फूर्तपणा एकाच ठिकाणाहून येतो. कधी गाण्याच्या माध्यमातून गळ्यातून तर कधी पेंटिंगच्या माध्यमातून हातातून. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचे आविष्कार जरी वेगवेगळे असले, तरी कला ही एकच आहे. कलेच्या प्रांतात कलाकारांची स्पर्धा नसते. तर स्वत:शीच स्पर्धा असते. त्यातूनच कलाकाराचे ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत होते.