गाेरक्षण व्यवस्थित न केल्याने सत्ता स्थापनास अडचणी : मिलिंद एकबाेटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 18:39 IST2019-11-07T18:26:04+5:302019-11-07T18:39:53+5:30
रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये गाेहत्येच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदाेलन करण्यात आले.

गाेरक्षण व्यवस्थित न केल्याने सत्ता स्थापनास अडचणी : मिलिंद एकबाेटे
पुणे : मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे गाेरक्षणाचे काम व्यवस्थित न केल्यामुळे आता सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत असल्याचे वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबाेटे यांनी केले. राजकारण्यांनी गाेमातेचे रक्षण केल्यास त्यांचे राजकारण व्यवस्थित चालेल असेही ते यावेळी म्हणाले. पुण्यात रावसाहेब दानवे यांच्या गाेहत्येसंदर्भातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून झाशीच्या राणी चाैकात आंदाेलन करण्यात आले त्यावेळी ते बाेलत हाेते.
दानवे यांनी जालना येथील एका मेळाव्यात गाेहत्येचे समर्थन करणारे वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला. झाशीच्या राणी चाैकात दानवेंच्या विराेधात आंदाेलन करण्यात आले. यावेळी दानवेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. गाे- हत्येचे समर्थन करणाऱ्या 'रावसाहेब दानवेचा धिक्कार असाे,' 'गली गली में शाेर है, रावसाहेब मियाॅं कसाई, चाेर है' असे लिहीलेले फलक आंदाेलकांनी हातात धरले हाेते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकबाेटे म्हणाले, ज्यांना गाेमातेचा मान कळत नाही, ज्यांना धर्माशी देणंघेणं नाही त्यांनी राजकारण करण्याची गरज नाही. गाेरक्षक त्यांच्यावर बहिष्कार टाकतील. माॅब लिंचिंगचा आराेप गाेरक्षंकांवर केला जाताे. ही एकतर्फी लबाडी आहे. ही कसायाची उलटी बाेंब आहे. गाेररक्षण करताना माझ्यावर पाचवेळा कसायांनी हल्ला केला आहे. परंतु कसायांनी केलेल्या माॅब लिंचिंगवर बाेलले जात नाही.
गाईविषयी बाेलताना ते म्हणाले, गाे मुत्रामुळे कॅन्सर बरा हाेताे. दुधामुळे लहानमुलांची हाडे मजबूत हाेतात. शेणामुळे त्वचाराेग बरे हाेतात. गाईच्या शेणाचा साबण वापरल्यास आपली त्वचा निराेगी राहते. आपले व्यक्तिमत्व तेजस्वी दिसते. या सगळ्या गाेष्टी गाईपासून लाभणाऱ्या आहेत. गाई ही अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम आहे. जगात गाईसारखा दुसरा प्राणी नाही. संपूर्ण जगात 84 लाख प्राणी आहेत. त्यात गाईकडे एवढी वैशिष्टे आहेत. असे असताना सरकारला आजपर्यंत संपूर्ण देशात गाेहत्याबंदी लागू करता आली नाही ही दुर्दैवाची गाेष्ट आहे.