"गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:34 IST2025-01-10T10:33:18+5:302025-01-10T10:34:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची विकासाची दिशा कशी असेल याबाबत भाष्य केले आहे

CM Devendra Fadnavis has commented on the direction of Maharashtra development in the next five years | "गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

"गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ हे वर्ष मोठी उलथापालथ घडवणारं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती होऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झालं. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कारभार पाहिला. मात्र २०१९ स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला जून २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला.  त्यामुळे २०१९ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात महत्त्वाचं ठरलं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ हे वर्ष आलं नसतं महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं असं विधान केलं आहे.

सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची विकासाची दिशा कशी असेल हे सांगितले. तसेच उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान कुठं आहे यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रात २०२२ नंतर विकासाला गती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

२०१४ ते २०२४ या १० वर्षांच्या काळामध्ये माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसं झालं आहे. मी कधी मंत्रीही झालेलो नसताना थेट मुख्यमंत्री झाल्याने 'हा काही करू शकेल की नाही?' या विचाराने २०१४ मध्ये लोक माझ्याकडे संशयाने बघायचे. पाच वर्षांच्या पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो आहे. तेव्हा लोकांनी मी काय करू शकतो, किंवा माझी क्षमता काय, ते अनुभवले आहेत. एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केल्याने परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही. आव्हानं पेलतांना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर चालत राहायचं, असा माझा प्रयत्न असणार आहे. गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. २०१९ ते २०२२ या कालावधीत विकासाला खीळ बसली होती. २०२२ नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता दाव्याने हे सांगतो आहे की महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असा विकसित महाराष्ट्र पाहण्यास मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये प्रशासनाने त्यांचे सादरीकरण करून ते काय करणार हे मांडले आहे; तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सात कलमी कार्यक्रमदेखील मांडलेला आहे. या १०० दिवसांच्या उदिष्टांवर राज्य सरकारच्या पुढील पाच वर्षाच्या कामाची दिशा स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय घड़ी ही चांगली आहे. फक्त त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता होती. प्रशासनाकडून कसे काम करून घ्यायचे, हे गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. दिल्लीत आता ठग आणि दलाल सापडत नाहीत. प्रशासन लवकर नवीन बदल स्वीकारत नाही, ते बदल त्यांच्याकडून करून घ्यावे लागतात," असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: CM Devendra Fadnavis has commented on the direction of Maharashtra development in the next five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.