अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:13 IST2018-01-04T03:13:15+5:302018-01-04T03:13:27+5:30
अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.

अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान
बिबवेवाडी - अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी नऊच्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एक-दोन बसवर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येण्यासाठी बंदी केली. काही बसला बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या मागे लावण्यात आले. तर काही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या. अनेक वेळा आंदोलक आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत कोरेगाव भीमाला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रत्येक चौकात भाजपाच्या विविध नेत्यांचे रस्त्यावर लागलेले फलक काढून जाळण्यात आले. दुपारी तीनपर्यंत अनेक चौक अडवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भागातील सर्व दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले
होते. काही शाळा, दवाखाने, बँका मात्र सुरू होत्या.
वडगाव, धायरीमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
वडगाव बु. : येथे कडकडीत तर धायरीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम धायरी परिसरातील दैनंदिन जीवनातील व्यवहारात दिसून आला. दिवसभर मेडिकल, बँका (अत्यावश्यक सेवा) वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. परिसरात शांततेत हा बंद पार पडला. परिसरातील काही शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नगण्य होती. सर्व प्रमुख रस्त्यावर वर्दळ खूप कमी होती, पीएमपीदेखील क्वचित दिसत होत्या. वडगाव बु. व धायरीतील प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दलित तरुणांनी दुचाकी व पायी मोर्चे काढून कोरेगाव भीमातील घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.