डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम ; पुण्यात २३७ टन कचरा संकलन.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:13 IST2019-05-12T17:11:35+5:302019-05-12T17:13:16+5:30
पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची हाक दिली होती.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम ; पुण्यात २३७ टन कचरा संकलन.
धनकवडी : पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची हाक दिली होती. या पार्श्वभुमीवर राबविण्यात आलेल्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेअंतर्गत पुण्यात १०९ किलोमीटरच्या रस्त्यांची दुतर्फा साफसफाई करण्यात आली. यात सुमारे २३७ टन कचरा संकलीत करण्यात आला. रविवारी सकाळी सात वाजता राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत ४०१७ स्वयंसेवक सहभागी झाले होते. रस्त्यांसह महापालिका, ससून रूग्णालय, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय,सेंट्रल बिल्डींग आदी विविध ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत असलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह देशभरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व उपनगरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची सफाई करण्यात आली. यामध्ये सातारा रस्ता, सहकारनगरचा गोळवलकर रस्ता व मित्र मंडळ रस्ता, पर्वती रस्ता, स्वामी विवेकानंद रस्ता, कोथरूड विभागातील कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, लष्कर भागातील प्रमुख, नगर रस्ता, विमानतळ रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांसह हडपसर, कोंढवा आदी सर्व उपनगरांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. विशेषत: ससून रूग्णालय ,शासकीय कार्यालय , दवाखाना , पोलीस स्टेशन , आर. टी. ओ. एसटी वर्कशॉप , विमानतळ असा ४२६८७७ स्क्वेअर फुट परिसराची अंतर्बाह्य सफाई करण्यात आली. सकाळी सात वाजता एकाच वेळी शहर व उपनगरात या स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. सारसबाग येथे महापौर मुक्ता टिळक , घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक या मोहिमेत सहभागी झाले होते.
या मोहिमेसाठी महापालिकेडून कचरा बकेट, ट्रॉली, डंपर, ट्रॅक्टर, देण्यात आली होती. प्रतिष्ठानने स्वयंसेवकांना खराटे, मास्क, हातमोजे दिले होते. महपालिकेच्या संकलन व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी प्रतिष्ठानने वाहतूकीच्या वाहनांची व्यवस्था केली होती. प्रतिष्ठानच्या सुचनेनुसार श्री सदस्य पणे यामध्ये उत्सुर्तपणे सहभागी झाले होते.