Classical music seemed boring, but liked to learn: Viraj Joshi | शास्त्रीय संगीत बोअर वाटायचे, पण शिकल्यावर आवडू लागले : विराज जोशी

शास्त्रीय संगीत बोअर वाटायचे, पण शिकल्यावर आवडू लागले : विराज जोशी

ठळक मुद्देसवाईमध्ये सादरीकरण केलेला सर्वात तरुण गायक विराज जोशी याच्याशी संवादस्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा नातू आणि श्रीनिवास जोशी यांचे चिरंजीव अशी ओळखअवघ्या सोळाव्या वर्षी ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात किराणा घराण्याच्या अभिजात गायकीची झलक

नम्रता फडणीस - 
* सध्या तू कोणते शिक्षण घेत आहेस? संगीताच्या रियाजासाठी कसा वेळ देतोस?
-  मी डॉ. कलमाडी श्यामराव हायसकूलमध्ये अकरावीचे कला शाखेचे शिक्षण घेत आहे. रोज अमुक इतका वेळ रियाज करतोच असे नाही. पण एकदा रियाजला बसलो की किती वेळ बसलोय ते पाहात नाही.
* तू शास्त्रीय संगीताकडे कसा वळलास ?
- मी सुरुवातीला भजन वगैरे शिकलो होतो. कधी कधी सवाईमध्ये बाबांबरोबर सूर लावायला बसायचो.सवाईच्या लंच ब्रेक आधी जो थोडा कालावधी असतो. लोक उठून जात असतात. त्या दरम्यानच्या वेळेत मी तीन भजनं गायलो होतो. तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो.रसिकांना ती भजनं आवडली होती. मग शास्त्रीय संगीत शिकायला लागलो. आजोबांच्या सिद्धी अल्बमधील  ' तोडी' रागाची सीडी मी ऐकली. 'ताज की हाऊस' ला मी तो राग गाणार होतो. म्हणून बाबांनी मला आजोबांचा हा राग ऐकायला सांगितला.तेव्हापासून माझा शास्त्रीय संगीताकडे ओढा वाढला.
* 'सवाई'मध्ये सादरीकरणासाठी प्रचंड रियाज लागतो. बाबांनी तुझ्याकडून  कशा पद्धतींने तयारी करून घेतली?
- बाबांनी पहिल्यांदा ' खर्ज्य' कसा लावायचा हे शिकवले. पूर्वी आणि आत्ताच्या काळातील रियाजात खूप फरक आहे. मी लहान आहे पण माझ्या मते प्रत्येक रागाचा एक मूड असतो. मी आठ ते नऊ महिने एकच राग शिकत बसलो तर मला कदाचित कंटाळा येईल. त्यामुळे राग एके राग न शिकता कधी आवाज लावण्याचा सराव करतो. राग म्हणजे  ताना, आलापी असते. पण त्याचा टोन कसा आहे हे ओळखणे आवश्यक असते. सुराला चिकटण कस असत हे बाबा सांगतात. कधी यमन कधी पुरिया धनश्रीचा सराव करतो.
* गायनातच करिअर करायचं हे तू मनातून कधी पक्के केलेस?
-वयाच्या नवव्या वर्षीच भजने गायला लागलो. तेव्हा माझ खूप कौतुक व्हायचं. पण हे तेवढं सोपं नाही हे देखील माहिती होते. तेराव्या वर्षी शास्त्रीय संगीतात अधिक रस निर्माण झाला. मला गाण्यात करिअर करायचं असल तरी मी शिक्षण देखील पूर्ण करणार आहे. ते सोडून गाणं एके गाणं असे करणार नाही.
* पंडित भीमसेन जोशी यांच्या घराण्याचे खूप मोठे वलय असल्याने आजोबांशी तुलना होणे आणि त्यातून स्वत:ला सिद्ध करणे हे आव्हान वाटते का?
- जे आपण असतो ते आपल्याला दिसत असते. आजोबा खड्या आवाजात गायचे त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते.गायकाच्या गायकीतूनच त्याचे व्यक्तिमत्व दिसून येते. त्यामुळे आपण कुणासारखं वागायला जात नाही. माझी गायकी काय आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला भीती वाटत नाही.
*तरुणाईसमोर विविध संगीताची अनेक आकर्षण आणि  माध्यम उपलब्ध आहेत.  या मध्ये तरुणाई शास्त्रीय संगीताकडे वळेल  असे वाटते का?
-कुठल्याही गोष्टीला फोकस हा लागतोच. शास्त्रीय संगीतासाठी समर्पित वृत्ती हवी. लोकांना भजन गाणं म्हणजे शास्त्रीय संगीत वाटते. मला पण सुरुवातीला शास्त्रीय संगीतात रस नव्हता. माझ्या घरात ते होते पण मला ते बोअर वाटायचे. अभिजात संगीत शिकायला लागल्यानंतर  शास्त्रीय संगीत किती रसाळ आहे हे कळले. लोक म्हणतात हे संगीत योग्य व्यक्तीच्या हातात जायला हवं.  माझ्याा पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्याची माझी इच्छा आहे.
------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Classical music seemed boring, but liked to learn: Viraj Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.