शंभूराजांच्या पुतळ्यास शहर सुधारणा समितीची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 21:22 IST2019-01-10T21:22:24+5:302019-01-10T21:22:55+5:30
बुधभूषणम हा ग्रंथ रचतानाचे छत्रपती शंभूराजांचे ब्रॉँझ धातूतील शिल्प जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये उभे करण्यास शहर सुधारणा समितीने गुरुवारी मान्यता दिली.

शंभूराजांच्या पुतळ्यास शहर सुधारणा समितीची मान्यता
पुणे : बुधभूषणम हा ग्रंथ रचतानाचे छत्रपती शंभूराजांचे ब्रॉँझ धातूतील शिल्प जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये उभे करण्यास शहर सुधारणा समितीने गुरुवारी मान्यता दिली. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी समितीसमोर ठेवला होता.
महापालिका क्षेत्रामध्ये सोयी-सुविधा निर्माण करण्यासोबतच विकासकामांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत विशेष अनुदान मंजूर करण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये शंभूराजांचे शिल्प साकारण्यास ऑगस्ट २०१४ मध्ये मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने जुलै २०१६ मध्ये संमती दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारास डिसेंबर २०१७ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले होते. या कामासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात ३० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कला संचालनालयाकडून जुलै २०१७ मध्ये परवानगी देखील मिळाली होती. या शिल्पाच्या जोत्याचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार नव्याने पुतळा बसविण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील पुतळा समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आयुक्त राव यांनी शहर सुधारणा समितीपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.