पुणे शहरात आता मास्क न वापरल्यास नागरिकांना होणार ५०० रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 15:38 IST2020-06-25T15:37:40+5:302020-06-25T15:38:08+5:30
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 13 हजारांच्या पुढे गेली आहे.

पुणे शहरात आता मास्क न वापरल्यास नागरिकांना होणार ५०० रुपये दंड
पुणे : कोरोनाचा शहरातील फैलाव वाढत चालला असून मास्क न वापरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अतिआत्मविश्वास नडण्याची चिन्हे दिसत आहेत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना आता जागेवरच ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरोग्य निरीक्षकांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय आणि खासगी कार्यालयामध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरल्यास तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३ हजारांच्या वर गेला आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे प्रतिबंधत्माक उपाय म्हणून शहरातील सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयातील सर्व उपआरोग्य प्रमुख, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.