बिबट्याच्या दर्शनाने वडगावचे नागरिक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:46+5:302021-08-28T04:14:46+5:30
मागील अनेक महिन्यांपासून खेडच्या पूर्व भागातील अनेक गावांमधील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. साबळेवाडी, ...

बिबट्याच्या दर्शनाने वडगावचे नागरिक धास्तावले
मागील अनेक महिन्यांपासून खेडच्या पूर्व भागातील अनेक गावांमधील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहितेवाडी, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवाडी, चिंचोशी आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे.
मागील दोन दिवसात वडगाव-घेनंद व मोहितेवाडी परिसरात बिबट्या व एक मादी फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले आहे. यापूर्वी परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून पाळीव वासरे व पाळीव कुत्री फस्त केली आहेत. मागील दोन दिवसांपासून दिवसाढवळ्या हा बिबट्या व मादी भक्ष्याच्या शोधात वावरताना दिसत आहे. परिणामी बिबट्याच्या दहशतीने स्थानिकांमध्ये भीती भरली असून वनविभागाने उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
चौकट :
वनविभागाकडून पाहणी व जनजागृती
सध्या खरीप हंगामातील शेतकामे सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या व मादीच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून शेतकामात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभाग अधिकाऱ्यांनी गावात येऊन सीसीटीव्ही फुटेजची व परिसराची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती केली. वडगाव परिसरात वावरत असलेल्या मादीला दोन पिल्ले असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
गावात बिबट्या वावरत असल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. कारण यापूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागास आमचे सहकार्य राहील.
- तुषार बवले, अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना, खेड
फोटो ओळ : वडगाव - घेनंद येथे सीसीटीव्हीत कैद झालेली बिबट्याची मादी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)