पुणे : पुण्यात परदेशी कंपन्या यायला तयार असून त्यासंदर्भात नियोजन केले गेले नाही, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका म्हणजे पुतनामावशीचे प्रेम आहे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले़ पुणे शहरातील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची चिंता केली़ याविषयी मोहन जोशी यांनी सांगितले, की पुण्याची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाली़ त्यातील १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते घाईघाईने उद्घाटनही केले गेले़ मात्र इतके महिने गेल्यानंतरही या प्रकल्पांचे काय झाले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही़ तसेच पुण्यात भाजपाचे ८ आमदार, १ खासदार, १ केंद्रीय मंत्री व राज्यात २ मंत्री असूनही गेल्या अडीच वर्षांत केंद्र व राज्याकडून एकही मोठा प्रकल्प आणला गेला नाही, अशी टीका जोशी यांनी केली आहे़फडणवीस यांना काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही ही त्यांची स्वकमजोरी असून काँग्रेसने केलेल्या विकासकामांचे धडे फडणवीस यांनी आपला मित्रपक्ष शिवसेनेकडून घ्यावेत, अशी टीका काँग्रेस महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी मंगळवारी केली़ भाजपा ही दिशाभूल करणारी विधाने करून खोटा आभास व भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी आपल्या विधानांद्वारे सिद्ध केल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे़ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांचे पे्रम पुतनामावशीचे
By admin | Updated: February 15, 2017 02:22 IST