पुणे : लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नवीन ई-बस तसेच सीएनजी बस मार्गावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खिळखिळ््या झालेल्या, गळक्या बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट सोडायला तयार नाहीत. तर लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी? असा सवाल उपस्थित करून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्रीसाहेब, पीएमपीसाठी थोडा वेळ द्या’, अशी विनवणी करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १५० बसपैकी उर्वरीत १२५ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यापैकी ५० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच ११५ सीएनजी बसही मिळाल्या आहेत. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या बस मार्गावर धावण्यास सुरूवात होईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले होते. पण निम्मा ऑगस्ट महिना उलटला तरी या बस अद्यापही मार्गावर येऊ शकलेल्या नाहीत. सीएनजीच्या ७५ हून अधिक बसची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तर ई-बसच्या १४ बसची नोंदणी झाली असून उर्वरीत बसची प्रक्रियाही लवकरच पुर्ण होईल. त्यामुळे नोंदणी झालेल्या बस तरी मार्गावर आणण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एकीकडे खिळखिळ्या बसमधून प्रवाशांना धोकायदायकपणे प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे नवीन बस येऊनही त्या मार्गावर धावत नसल्याने प्रशासन प्रवाशांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसचे लोकार्पण व्हावे, या कारणास्तव पदाधिकाऱ्यांकडून पुणेकरांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. ‘आम्ही कोणत्याही दिवशी बस मार्गावर आणण्यासाठी सज्ज असल्याचे अधिकारी सांगत आहेत. याबाबत प्रवाशांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.------------बसेस नागरिकांच्या घामाच्या कष्टाचा टॅक्सच्या पैशातून आलेल्या आहेत. आणि त्याचा वापर त्यांना करता येत नाही यासारखे दुर्दैव नाही. आलेल्या नवीन बस कोणत्याही उद्घाटनाची वाट न पाहता प्रवाशांसाठी सोडाव्यात. या बस राजकीय अजेंडा राबवण्यासाठी नसून पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित सुरळीत होण्यासाठी आहे. - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच
मुख्यमंत्रीसाहेब...! पीएमपीला थोडा वेळ द्या : पुणेकरांची विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:36 IST
सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट सोडायला तयार नाहीत. तर लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी?
मुख्यमंत्रीसाहेब...! पीएमपीला थोडा वेळ द्या : पुणेकरांची विनवणी
ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार