PMRDA: मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळेना, पीएमआरडीएचे प्रकल्प मार्गी लागेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:41 IST2023-06-16T13:41:30+5:302023-06-16T13:41:48+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मिळविण्यासाठी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे....

PMRDA: मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळेना, पीएमआरडीएचे प्रकल्प मार्गी लागेनात
पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेला सव्वाआठ वर्षांचा कालावधी झाला. परंतु, पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा व सर्वंकष वाहतूक आराखड्याला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही. तसेच, एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. मुख्यमंत्री हे पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र, आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी पीएमआरडीएसाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मिळविण्यासाठी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
पीएमआरडीएचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो धावण्याची अपेक्षा असून या प्रकल्पाचे काम ४० टक्के झाले आहे. जमिनीखालील पाया टाकून त्यावरील खांबाचे, सेगमेंट, व्हायाडक्ट/गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रोचे सिमला ऑफिस, आकाशवाणी, शिवाजीनगर कोर्ट कनेक्टिव्हिटी व रॅम्पचे काम सुरू आहे. मात्र, इतर प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू आहेत.
‘टीपी स्कीम’ संथगतीने
आयटी पार्कजवळ म्हाळुंगे-माण टीपी स्कीम प्रस्तावित आहे. या स्कीममधील ५५ नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयाशिवाय टीपी स्कीम पूर्णत्वास जाणार नाही. औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी ४ व ५, वडाचीवाडी, मांजरी व कोलवडी या टीपी स्कीम शासनाकडे मंजुरीसाठी सादर केल्या आहेत. त्याचेही काम संथ आहे.
प्रधानमंत्री आवासचा पहिला टप्पा पूर्ण
पिंपरी-चिंचवड शहरातील जाधववाडी येथे सेक्टर १२ मधील गृह प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ४ हजार घरे नागरिकांना दिली. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाची मान्यतेची प्रतीक्षा आहे.
प्रारूप डीपीला मुदतवाढ
प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाला असून महानगर समिती व प्राधिकरण सभेसमोर तो सादर करण्यात येणार आहे.
रिंग रोडचे काम रखडले
रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. भूसंपादन प्रक्रियेसाठी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. भूसंपादनानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊ शकेल. त्यामुळे तेही काम रखडलेले आहे.
मार्गी लागलेली कामे
जीआयएस प्रणाली
झोन दाखले ऑनलाइन
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी
प्रारूप विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर सर्व प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. चार-पाच टीपी स्कीम प्रक्रियेत आहेत.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए.