पुणे: मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्याने त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी, यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून मागणी केली होती. त्या मागणीला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सहमती दर्शवली असून, याबाबत विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘लोकमत’ने या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सध्या सिंगल स्क्रीन थिएटरला काही सवलती देता येतील का, तसेच मराठीनाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का, याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत, असे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये या विषयावर बैठक झाली.
नाट्यगृहांमध्ये नाटकाचा प्रयोग नसेल तर त्यावेळी चित्रपट दाखवता येऊ शकतो, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यानंतर पहिला प्रयोग पुण्यातच पुणे महापालिकेसोबत करण्यात आला. पालिकेने यशवंतराव नाट्यगृहात याविषयी एका मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता या विषयावर मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस हे देखील सकारात्मक आहेत. राज्यामध्ये लवकरच नाट्यगृहांमध्ये चित्रपटदेखील पाहायला मिळतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.