आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: February 17, 2016 01:07 IST2016-02-17T01:07:13+5:302016-02-17T01:07:13+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कारकूनपदावर कामाला लावण्यासाठी शिंदवणे व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील चार तरुणांची ६ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे

आमिष दाखवून फसवणूक
उरुळीकांचन : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कारकूनपदावर कामाला लावण्यासाठी शिंदवणे व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील चार तरुणांची ६ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. रोहन शेखर गणेशकर (रा. वाणेवाडी, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे.
तुषार अंकुश कवडे व आकाश महादेव शिरसट (दोघे रा. शिंदवणे, ता. हवेली), प्रदीप विठ्ठल कुंजीर (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. गणेशकर व तुषार कवडे काही वर्षांपूर्वी एकत्र वसतिगृहात राहत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी रोहन व तुषार भेटल्यानंतर मी मुंबई महानगरपालिकेत कामाला असून मंत्रालयापर्यंत माझी ओळख आहे, त्यामुळे मी तुला कुठल्याही नगरपालिकेत कामाला लावू शकतो, पण त्यासाठी काही पैसे भरावे लागतील, असे रोहनने तुषारला सांगितले. जुना ओळखीचा मित्र असल्याने तुषारने त्याच्याबरोबर आणखी तीन मित्रांचेही काम करण्याची विनंती रोहनला केली. त्यानुसार रोहनने सर्वांना नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी १ लाख ५५ हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे ठाणे येथे १६ व २३ डिसेंबर रोजी ४ लाख रुपये व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे २३ जानेवारी या दिवशी प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे २ लाख रुपये आरोपीला देण्यात आले, उर्वरित २० हजार रुपये जमा केल्यास ट्रेनिंग पूर्ण होऊन नियुक्ती आदेश मिळणार असल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले होते. याच कालावधीत पालिकेतील जागांवरील नियुक्ती पूर्ण झाल्याचे सांगून नोकरीची जास्तच गरज असेल तर आणखी एक लाख रुपये द्यावे लागतील, असे रोहन याने सांगितले. यातील एका तरुणाकडे पैसे नसल्याने त्याने नातलगाकडे पैशाची मागणी केली. त्या वेळी या नातलगाने नोकरी कोण लावतो? ते दाखविण्याची विनंती केली.
काल सायंकाळी ६ च्या सुमारास रोहन याने खाकी रंगाच्या बंद पाकिटात कोरे कागद भरून दिल्याचे लक्षात येताच, तो खोटे बोलून फसवत असल्याचा संशय आल्याने माहिती यादव यांनी सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांना दिली. त्यानंतर त्याला उरुळीकांचन येथील बस थांब्याशेजारील हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.