रथोत्सव मिरवणूक : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या मंदिरावर २२ किलोच्या सोन्याचे कलशारोहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 21:28 IST2025-08-15T21:27:44+5:302025-08-15T21:28:18+5:30
ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक : देवेंद्र फडणवीस

रथोत्सव मिरवणूक : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या मंदिरावर २२ किलोच्या सोन्याचे कलशारोहण
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाबाजी काळे, उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, देवेंद्र पोटे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, ॲड. रोहणी पवार, चैतन्य कबीरबुवा, पुरुषोत्तम पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपाण्याचे श्रेय वारकरी संप्रदायला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असतांना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे. २१ वर्षाच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले आहे. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवीत होते. संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली. शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला उर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करतांना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी(सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा २२ किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त योगी निरंजननाथ तर रोहिणी पवार यांनी आभार मानले.
'' संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल. माऊलींनी ९ हजार ओव्याच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री