कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी मानसिकता बदला : डॉ.भालचंद्र मुणगेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:39 PM2020-05-10T19:39:58+5:302020-05-10T19:41:06+5:30

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे मत डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

Change the mindset to survive in the post-Corona world : Dr. Bhalchandra Mungekar rsg | कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी मानसिकता बदला : डॉ.भालचंद्र मुणगेकर

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी मानसिकता बदला : डॉ.भालचंद्र मुणगेकर

Next

पुणे: कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग यात प्रचंड तफावत असणार आहे .शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही.त्यामुळे कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.मुणगेकर यांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युट्युब चॅनेलच्या माध्यमातून या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, राज्याचे कृषी व सहकार  राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि  प्र.कुलगुरू डॉ. विश्वजित कदम,कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव, डॉ.एम. एस. सगरे, व.भा. म्हेत्रे ,कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

डॉ.मुणगेकर म्हणाले, कोरोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून त्याची मोठी किंमत भारतासारख्या विकसनशील देशाला मोजावी लागणार आहे. विकास दरात ऐतिहासिक घसरण होणार असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.अशा काळात नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थी स्वतःच्या कुवतीनुसार छोटे मोठे उद्योग करून अर्थार्जन  करू शकतील,असे सामर्थ्य विद्यापीठांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे लागेल.

प्राध्यापकानी केवळ ग्रंथालयात बसून अभ्यासक्रम न ठरवता औद्योगिक क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, याचाही विचार केला पाहिजे. लॉकडाऊन संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि जनतेशी संवाद साधून पुढची दिशा काय असेल, हे स्पष्ट केले पाहिजे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची संधी मिळाली असती तर चार कोटी मजुरांची ससेहोलपट झाली नसती,असेही मुणगेकर म्हणाले.

डॉ.विश्वजित कदम म्हणाले,  भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ.पतंगराव कदम यांनी बहुजन समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली. भारती विद्यापीठाने केवळ पदवीधर नाही तर देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार केले. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या प्राणाची पर्वा न करता जे योगदान देत आहेत. त्याविषयी आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. कोरोना नंतर येणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांनी सज्ज असले पाहिजे.

कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधनात मानवी समूहाचे अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे.  संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे,असे आपण आजवर म्हणत होतो. समाजाचे प्राण वाचविण्याचे काम संशोधनातून झाले पाहिजे.ही काळाची गरज आहे. -डॉ.शिवाजीराव कदम ,कुलपती, भारती विद्यापीठ,
 

Web Title: Change the mindset to survive in the post-Corona world : Dr. Bhalchandra Mungekar rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.