पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण; पालकमंत्रीही पाटीलच?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:55 IST2022-08-12T13:55:28+5:302022-08-12T13:55:35+5:30
भाजप कार्यकर्त्यांना अजूनही आशा

पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण; पालकमंत्रीही पाटीलच?
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या सरकारी कार्यक्रमात मंत्री चंद्रकात पाटील यांच्याच हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नागपूरसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्यासाठी पाटील यांचे नाव आहे.
फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होतील, अशी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. ही यादी पालकमंत्र्यांची नाही तर कोणते मंत्री ध्वजारोहण करतील याची आहे, असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अजूनही त्यांना फडवणीसच पुण्याचे पालकमंत्रिपद घेतील, अशी आशा त्यांना आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या जिल्ह्यात शह द्यायचा असेल तर फडणवीसच हवेत, असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटते.
चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले तरीही ते पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील सत्ताकाळात ते अखेरच्या वर्षभरासाठी पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मंत्र्यांचे खातेवाटप तसेच पालकमंत्रिपद निश्चित केले जाईल, त्यावेळी पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करून फडणवीस पुण्याचे पालकमंत्रिपद घेतील, असे भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी खासगीत बोलत आहेत.