विकासकामे वेगाने मार्गी लावू, निधीची अजिबात कमतरता नाही- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:07 IST2022-10-15T18:04:12+5:302022-10-15T18:07:15+5:30
पशुसंवर्धन विभागाने लंपी आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल...

विकासकामे वेगाने मार्गी लावू, निधीची अजिबात कमतरता नाही- चंद्रकांत पाटील
पुणे : जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च होईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने लंपी आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बिबट्या पकडण्यासाठी अधिकचे पिंजरे लावावेत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक नियोजन करावे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निवडक स्थळ घेऊन तेथील विकासाचे नियोजन करावे, जेणेकरून अशा ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आगामी काळातील रोजगार कौशल्याधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर पॅनेल बसवावेत-
शासकीय कार्यालयांचा वीजेचा खर्च वाचवण्यासाठी आवश्यक वीज सौरऊर्जेवर निर्मित करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.