वाहनचोरांचे पोलिसांसमोर आव्हान
By Admin | Updated: July 17, 2014 03:09 IST2014-07-17T03:09:35+5:302014-07-17T03:09:35+5:30
मालमत्तेच्या गुन्ह्यांत मोडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

वाहनचोरांचे पोलिसांसमोर आव्हान
लक्ष्मण मोरे, पुणे
मालमत्तेच्या गुन्ह्यांत मोडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुर्दैवाने चोरीला गेलेल्या वाहनांच्या तपासाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. गेल्या आठवड्यात फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये चोरीची मोटारसायकल वापरण्यात आल्यामुळे वाहनचोरीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरीच्या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
१० जुलैला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी दगडूशेठ मंदिराच्या अगदी जवळ व पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटासाठी जी मोटारसायकल वापरण्यात आली ती एका पोलीस कर्मचाऱ्याची असून, सातारा न्यायालयामधून चोरण्यात आली होती. यासोबतच १७ एप्रिल २०१३ रोजी बेंगळुरु शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्येही चोरीचीच मोटारसायकल वापरण्यात आली होती. चोरीची वाहने नंबर प्लेट न बदलता दहशतवादी कारवायांमध्ये वापरण्यात येत आहेत. काही उदाहरणांमधून हे स्पष्ट झाले आहे.
विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी आणि १७ ते ३० या वयोगटातील तरुण वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक सहभागी असल्याचे पुणे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे. पुण्यामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोनसाखळी चोऱ्या, घरफोडी, लूटमार, वाटमारी अशा गुन्ह्यांसाठीही चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कधी कामाची निकड म्हणून, तर कधी हौसेने खरेदी केलेली वाहने चोरटे लीलया चोरून नेत आहेत.
इतर कोणत्याही वाहनाच्या चोरीपेक्षा मोटारसायकल किंवा दुचाकी (मोपेड) चोरणे अधिक सोपे असल्यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण मोठे आहे. वाहने चोरणे, त्यांच्यामध्ये बदल करणे, नंबर प्लेट बदलणे अशा कामांमध्ये काही गॅरेजचालक, सोसायटीचे सुरक्षारक्षक सामील असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. गुन्हे शाखेकडून जरी वाहनचोरीचे काही गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले; तरी ा ते प्रमाण खूपच कमी आहे. पोलिसांनी हस्तगत केलेली चोरीची वाहने नेण्यासाठी कधी कधी वाहनाचे मालकही समोर येत नाहीत. अनेकदा पकडलेल्या वाहनांमधील महत्त्वाचे पार्ट गायब असतात. ही वाहने नेऊनही फारसा फायदा होत नसल्यामुळे मालक वाहने घ्यायला फिरकतच नाहीत.