चाकणच्या सराईत खंडणीखोरास अटक
By Admin | Updated: February 15, 2016 02:42 IST2016-02-15T02:42:39+5:302016-02-15T02:42:39+5:30
द्योजकाकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

चाकणच्या सराईत खंडणीखोरास अटक
पुणे : उद्योजकाकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
गणेश बाळू कोळेकर (वय २७, रा. स्वप्ननगरी, चाकण) असे आरोपीचे नाव आहे. उद्योजक प्रकाश मोतीलाल भन्साळी (रा. घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने भन्साळी यांना फोन करून २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. सीसीटीव्ही फुटेज असलेली सीडी तयार करुन सुपारी दिल्याचेही तो धमकी देताना म्हणाला होता. भन्साळी यांनी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली.
आरोपीने यापूर्वी खेड तालुक्यातील एका माजी आमदाराच्या नातेवाईकाला धमकी दिल्याचे समोर आले आहे. तसेच नाशिक येथील आमदाराच्या सहका-याकडेही त्याने विरोधी पक्षातील आमदार, खासदारांची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे देण्याचे आमिष दाखवुन पैशाची मागणी केली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस कर्मचारी निलेश देसाई, सचिन अहिवळे, प्रशांत पवार, सिद्धार्थ लोखंडे, प्रमोद मगर, धिरज भोर, रमेश गरूड यांनी ही कारवाई केली.