चाकण नगरपरिषद हद्दवाढीस १६ गावांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:14 IST2018-08-24T23:13:29+5:302018-08-24T23:14:01+5:30
सर्व सोळा गावांतील ग्रामस्थांच्या विरोधाचा विचार करून सर्व गावांतील सरपंचांची नुकतीच मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.

चाकण नगरपरिषद हद्दवाढीस १६ गावांचा विरोध
चाकण : परिसरातील गावांनी चाकण नगरपरिषदेत जाण्यास विरोध दर्शविला आहे. हद्दवाढीबद्दल प्रस्तावित गावांना विश्वासात न घेता काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी या सर्व गावांतील ग्रामस्थांचा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध असल्याचे सरपंचांचे प्रतिनिधी रामदास मेदनकर यांनी सांगितले. सर्व सोळा गावांतील ग्रामस्थांच्या विरोधाचा विचार करून सर्व गावांतील सरपंचांची नुकतीच मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.
प्रांताधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार अर्चना यादव यांना सर्व १६ ग्रामपंचायतींच्या वतीने मेदनकरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य रामदास मेदनकर, महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, कडाचीवाडी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बाळासाहेब कड, माऊली कड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
नगरपरिषदेत समावेश करून कोणत्याही गावांचा विकास होणार नाही, ही बाब ओळखून सर्व गावच्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. वेळप्रसंगी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी या सर्व गावांच्या लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे.