बारामती : ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे राज्यातील सकल ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला सकल ओबीसी मतदारांनी भुजबळ यांच्या आदेशाने ९७ ते ९८ टक्के मतदान केले. असे असताना ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. हा राज्यातील ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय आहे. हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्याचे ओबीसी समाजाने निवेदनात नमुद केले आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर काैले, अनिल लडकत, निलेश टीळेकर, किशोर हिंगणे, बापुराव लोखंडे, संजय गिरमे, दत्ता लोणकर, बापु बनकर, महावीर लोणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.