मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या वर्षभरात केली दीड कोटी रुपयांची वीज बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:53 IST2018-01-06T18:50:25+5:302018-01-06T18:53:42+5:30
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या वर्षभरात केली दीड कोटी रुपयांची वीज बचत
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे.
वीज बचतीसाठी पुणे विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने मागील वर्षभरात विविध उपाययोजना करण्यात आल्या. याविषयी विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी माहिती दिली. पारंपरिक वीज उपकरणांच्या जागी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेचा वापर वाढविला जात आहे. समपार फाटकांवर सौर एलईडी, आरक्षण तसेच बुकिंग कार्यालयांमध्ये सौर युपीएस आणि कोल्हापूर, मिरज तसेच घोरपडी येथील रनिंग रूममध्ये सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे १४ लाख ५४ हजार युनिटची वीज बचत झाली आहे. त्यामुळे विभागाला वर्षभरात १ कोटी ४५ लाख ४५ हजार रुपयांचा फायदा मिळाला आहे.
सौर उर्जेच्या माध्यमातून रेल्वे स्थानक तसेच परिसरात दिवे, पंखे आदी विद्युत सुविधा केल्या जात आहेत. त्यासाठी विभागात दोन सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर ‘सीएसआर’ अंतर्गत १६० किलोवॅट क्षमतेचा तर दौंडज स्थानकावर १० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. तसेच स्थानक व कार्यालयांमध्ये सर्व पारंपरिक उपकरणांच्या जागी नवी अत्याधुनिक उपकरणे बसविली जाणार आहेत. त्यामुळे ७ लाख ३१ हजार युनिटची बचत अपेक्षित आहे. तसेच पुढील काळात विभागात विविध ठिकाणी एकुण १.२ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे १७ लाख ५२ हजार युनिटची बचत होईल. त्यामुळे रेल्वेला १ कोटी ४७ लाख रुपयांचा फायदा होणार असल्याचे देउस्कर यांनी सांगितले.