मार्गासनी - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड येथे छत्रपती राजारामराजेंचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात पार पाडला.शिवकालीन वाद्य व शिवकालीन पोषाख परिधान केलेल्या मावळ्यांनी संपूर्ण राजगड दुमदुमला होता. शिवशंभो प्रतिष्ठान महाराज्य राज्य व इतर संस्थांनी एकत्रित येऊन किल्ले राजगडावर राजारामराजेंचा जन्मोत्सव साजरा करण्याचे योजिले होते, अशी माहिती शिवशंभो प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष महेश कदम यांनी दिली. सर्वप्रथम किल्ले राजगडाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ल्यावरील पद्मावतीदेवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजारामराजेंच्या प्रतिमेची पालखी पद्मावती मंदिरापासून राजसदरेपर्यंत ढोलताशाच्या गजरात काढण्यात आली. या वेळी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व लेखक अप्पासाहेब परब यांनी राजारामराजेंच्या जीवनावर व्याख्यान दिले.यावेळी राहुल गोरे, विकास साळुंके, मंगेश धोंडे, भरत पवार, गौरव बलकवडे, अविनाश साबळे, काशिनाथ आव्हाळे, नवनाथ पायगुडे, सचिन खोपडे, आनंदराव जाधव, कुलदीप जाधव, श्रमिक गोजगुंडे, गणेश निगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास बारा मावळ परिसर, दुर्गरक्षक प्रतिष्ठान, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, शककर्ते शिवराज सेवासंस्था या संस्थांचेही सहकार्य लाभले. कात्रजच्या शिवशंभो प्रतिष्ठानने या कामी पुढाकार घेतला होता.महेश कदम म्हणाले, की छत्रपती संभाजीराजेंच्या निधनानंतर स्वराज्याची जबाबदारी अतिशय कणखरपणे आणि जबाबदारीने पार पाडून स्वराज्याला बळ देणारे आणि स्वराज्याचे रक्षण करणारे राजारामराजेचा जन्मोत्सव महाराष्ट्रात कोठेही साजरा केला जात नाही. किल्ले राजगडावर राजारामराजेंचा जन्म झाला. या त्यांच्या जन्मठिकाणापासूनच राजारामराजेंचा जन्मोत्सव सुरू करावा, असे आम्ही ठरविले.
राज्यात प्रथमच राजारामराजेंची जयंती साजरी, शिवशंभो प्रतिष्ठानचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 01:12 IST