चाकणला १८० पोती गुटखा पकडला, ५० लाखाचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 22:20 IST2018-09-28T22:17:45+5:302018-09-28T22:20:10+5:30

चाकणला १८० पोती गुटखा पकडला, ५० लाखाचा मुद्देमाल जप्त
चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक करताना चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीचा १८० पोती गुटखा पकडला.
याप्रकरणी चाकण पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक आयशर टेम्पोसह १८० पोती गुटखा जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई आज सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास करण्यात आली. गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून एसीपी चंद्रकांत अलसटवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, सातकर, अजय भापकर, एफडीआयचे अधिकारी महेंद्र पाटील व काकडे यांच्या पथकाने हि कारवाई केली. याप्रकरणी अब्दुलजार जमलुद्दीन शेख ( रा. वालिव चौक, वसई, जि.पालघर ) व अरुण रावसाहेब खोत ( रा. पंढरपूर ) या दोघांना आयशर टेम्पो क्रमांक ( एम एच १२ - एल टी - ३९८६ ) सह ताब्यात घेऊन टेम्पोतील गुटखा जप्त केला आहे.