पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली रोख रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:46 IST2024-03-06T13:45:52+5:302024-03-06T13:46:18+5:30
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत वेळ मारून नेली....

पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली रोख रक्कम
पुणे :पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाचशे रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली आहे. यासंदर्भात आपचा कार्यकर्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर नोटांच्या बंडलासह तो उपअभियंता पसार झाला आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत वेळ मारून नेली.
महापालिकेत पथविभाग आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संबंधित उपअभियंत्याकडे याची चौकशी करून ड्रॉवर उघडण्यास भाग पाडले. हा उपअभियंता हे चिकटपट्टीने पॅक केलेला बॉक्स उघडण्यास तयार नव्हता, त्यामुळे काळे यांनी हा बॉक्स उघडला असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले.
ही रक्कम कुठून आली, असे त्यांनी उपअभियंत्यास विचारले असता ही रक्कम ठेकेदार ठेवून गेला आहे, माझे पैसे नाहीत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून त्याची तक्रार केली. हा तीन मिनिटांचा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद केला आहे. काळे तक्रार करण्यासाठी अधीक्षक अभियंता अमर शिंदे यांच्याकडे गेले असता, त्याचवेळी हा उपअभियंता व रोख रक्कम या टेबलावरून गायब झाली.