जेजुरीला होणार बायपास रस्ता; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाख मंजूर

By नितीन चौधरी | Published: March 14, 2024 06:55 PM2024-03-14T18:55:05+5:302024-03-14T18:55:29+5:30

श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे

Bypass road to Jejuri 10 crore 68 lakhs sanctioned under Gad Pilgrimage Development Scheme | जेजुरीला होणार बायपास रस्ता; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाख मंजूर

जेजुरीला होणार बायपास रस्ता; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाख मंजूर

पुणे : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  अध्यक्षतेखालील समितीची मंजूरी मिळाली असून त्यासाठी १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही नियोजन विभागाने जारी केला आहे. 

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी १७ फेब्रुवारी रोजीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करुन त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची आणि मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानुसार कालंच नवीन कामांचा व निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १०९ कोटी ५७ लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे १० कोटी ६८ लाख रुपये मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. या निधीतून,  मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी २३ लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी २५ लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्‍या, १३ कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी २२ लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी १२ कोटी ५६ लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी २ लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी १० कोटी ७३ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत १२ कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी १८ लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

कामाला प्रत्यक्षात गेल्या जुलैमध्ये सुरुवात झाली. तर ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचे काम सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवर्‍या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायऱ्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत. पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.

Web Title: Bypass road to Jejuri 10 crore 68 lakhs sanctioned under Gad Pilgrimage Development Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.