पुणे: दिवाळीपूर्वी पाऊस थांबला आणि त्यानंतर अचानक उष्णतेचे प्रमाण वाढले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांत पाऊस पडला, या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे शहरात ‘ॲलर्जी’चा त्रास झपाट्याने वाढत आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात हवामानात झालेल्या अस्थिरतेमुळे अनेकांना नाकातून पाणी येणे, वारंवार शिंका येणे, डोळे लाल होणे, नाक बंद पडणे अशा त्रासांचा सामना करावा लागत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदल, हवेतील धूळ आणि दिवाळीतील फटाक्यांच्या धुरामुळे निर्माण झालेले प्रदूषण हे ॲलर्जी वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय झाडांवरील परागकण हवेत मिसळणे, घरातील बंद हवा व ओलावा, तसेच रस्त्यांवरील धूरही ॲलर्जीला कारणीभूत ठरत आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येत आहे. श्वास घेताना हवेतील सूक्ष्म धुळीचे कण फुप्फुसात जातात आणि त्यामुळे शिंका, नाक बंद होणे व श्वास घेण्यास त्रास अशा समस्या निर्माण होतात.
दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ॲलर्जीच्या रुग्णांमध्ये वाढ होते, मात्र गेल्या काही वर्षांत या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे वैद्यकीय नोंदी दर्शवतात. विशेषतः लहान मुलांमध्ये डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे या प्रकारच्या तक्रारी अधिक प्रमाणात आढळतात. बदलत्या हवामानामुळे ॲलर्जी, सर्दी, डोळ्यांचे विकार आणि श्वसनासंबंधी समस्या वाढत असल्याने नागरिकांनी सध्या विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
काळजी घेण्यासाठी उपाय
बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. दुचाकी चालवताना हेल्मेट लावावे. धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्यांना खाज आल्यास चोळू नये. अस्थमा असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ऋतू बदलल्यावर ॲलर्जीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा खाज येणे ही ॲलर्जीची प्राथमिक लक्षणे आहेत. वेळेवर उपचार न घेतल्यास हा त्रास वाढू शकतो. - डॉ. राहुल ठाकूर, कान-नाक-घसा तज्ज्ञ.
दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात सुमारे ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये ॲलर्जीचा त्रास दिसून येतो. विशेषतः लहान मुलांमध्ये डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे या प्रकारच्या तक्रारी अधिक प्रमाणात आढळतात. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. सतीश शितोळे, नेत्रतज्ज्ञ.
Web Summary : Fluctuating weather, pollution trigger allergy surge in Pune. Doctors advise precautions like masks and avoiding dusty areas, especially for children and elderly, as cases rise.
Web Summary : पुणे में बदलते मौसम और प्रदूषण से एलर्जी बढ़ी। डॉक्टरों ने मास्क पहनने और धूल से बचने की सलाह दी, खासकर बच्चों और बुजुर्गों को, क्योंकि मामले बढ़ रहे हैं।