पुणे : आचारसंहितेमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या विविध सुट्टे भाग खरेदी करण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला आचारसंहितेतून वगळण्याची विनंती पीएमपी प्रशासनाने निवडणुक अधिकाऱ्यांकडे केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी लागु झाली असून दि. २७ मेपर्यंत असणार आहे. या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. तसेच विविध विकासकामे, इतर कामांसाठी नवीन निविदा प्रक्रियाही राबविता येत नाही. पीएमपी बसला सातत्याने टायर, ऑईल, काचा यांसह विविध प्रकारच्या सुट्या भागांची आवश्यकता असते. त्यासाठी टप्याटप्याने निविदा प्रक्रिया राबवून खरेदी केली जाते. ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी केले जाते. मात्र, आता आचारसंहितेमुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे प्रशासनाला निविदा काढता येत नाहीत. परिणामी, टायर, कुलंट, ऑईल व अन्य काही सुट्टया भागांची खरेदी थांबली आहे.याविषयी माहिती देताना सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर म्हणाले, आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवायची की नाही याबाबत निवडणुक कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आचारसंहिता दोन महिने असल्याने या कालावधीत खरेदी न झाल्यास अडचणी येऊ शकतात. सध्या सुट्ट्या भागांची कोणतीही अडचण नाही. मुंबईतील बेस्ट प्रशासनानेही पीएमपी कडे खरेदी प्रक्रिया राबविण्याबाबत विचारणा केली आहे. ---------वेळेवर सुट्टे भाग मिळत नसल्याने पीएमपीच्या काही बस आगारातून बाहेर काढणे शक्य होत नाही. त्यातच आता आचारसंहितेच्या काळात खरेदी प्रक्रिया रखडल्यास बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बससेवा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने सुट्टया भागांची खरेदी प्रक्रिया आचारसंहितेतून वगळली जाईल. याबाबत निवडणुक कार्यालयाकडून पीएमपीला सवलत दिली जाईल. त्यामुळे बससेवेवर परिणाम होणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. --------
पीएमपी खरेदीला आचारसंहितेमुळे ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:00 IST
आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो.
पीएमपी खरेदीला आचारसंहितेमुळे ब्रेक
ठळक मुद्देया प्रक्रियेला आचारसंहितेतून वगळण्याची निवडणुक अधिकाऱ्यांकडे पीएमपी प्रशासनाची विनंती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी लागु झाली असून दि. २७ मेपर्यंत असणार पीएमपी बसला सातत्याने टायर, ऑईल, काचा यांसह विविध प्रकारच्या सुट्या भागांची आवश्यकता