Loan app वरून कर्ज घेणे पडले महागात! 3 हजारांसाठी भरावे लागले सव्वा लाख रुपये
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 27, 2023 16:41 IST2023-06-27T16:41:25+5:302023-06-27T16:41:56+5:30
एका ३३ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेला पैशांची गरज असल्याने त्यांनी एका लोन ऍपद्वारे ३ हजार रुपयांचे लोन घेतले होते...

Loan app वरून कर्ज घेणे पडले महागात! 3 हजारांसाठी भरावे लागले सव्वा लाख रुपये
पुणे : एका लोन ऍपद्वारे तीन हजाराचे लोन घेतले असता त्याची परतफेड करताना जास्तीची रक्कम मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. जास्तीची रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कॅम्प परिसरात घडला आहे.
एका ३३ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेला पैशांची गरज असल्याने त्यांनी एका लोन ऍपद्वारे ३ हजार रुपयांचे लोन घेतले होते. घेतलेल्या लोनची परतफेडसुद्धा केली होती. मात्र अज्ञात व्यक्तीने महिलेला वारंवार फोन करून जास्तीच्या पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नातेवाईकांना मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि घाणेरडे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेने बदनामीच्या त्रासाला कंटाळून जास्तीचे पैसे भरण्यास सुरुवात केली.
वारंवार असे मेसेज आणि फोन करून महिलेकडून तब्बल १ लाख ११ हजार ४९८ रुपये उकळले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके या करत आहेत.